एसटीच्या कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर या सणासाठी १२,५०० रुपयांची उचल देखील मिळणार आहे.
राज्यभरातील ८० हजाराहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. यंदाच्या दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ६ हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. तसेच या सणासाठी १२५०० रुपयांची सण उचल देखील मिळणार आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या तोंडावर आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेतल्याचे सू्त्रांकडून समजते.
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर आपल्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी चक्का जाम आंदोलनाचा निर्णय जाहीर केला होता. या आंदोलनामुळे एसटीच्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता होती. मात्र, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली आहे. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना ६००० रुपये दिवाळी भेट आणि १२,५०० रुपये उचल देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता यंदाची दिवाळी गोड जाणार आहे. या निर्णयात सरासरी ७५०० वेतनवाढ फरक हप्ता प्रति महिन्या देण्याचे देखील मान्य करण्यात आले आहे. एसटी महामंडळाला त्यासाठी सरकार दर महिन्याला ६५ कोटी रुपये देणार असल्याचे सांगण्यात येते.