आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आज ग्राहक जागा होताना दिसत आहे. डिसेंबर 1986 मध्ये कायदा मंजूर झाल्यानंतर 1988 मध्ये ग्राहक मंच व आयोगाची स्थापना झाली. आज जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आयोग स्थापन करण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी अधिकार आणि हक्कांबरोबर ग्राहकाला कर्तव्याची जाणीव असणे आवश्यक आहे. फसवणुकीबाबत तक्रार करणे हा ग्राहकाचा अधिकार, हक्क असला तरी तक्रार करताना ती तक्रार जबाबदारीने करणे हे कर्तव्य आहे.
वीज, दूरध्वनी, मोबाइल, इंटरनेट आदी सेवा पुरविणाञया कंपन्यांकडून मनमानी शुल्क वसूल करणे, प्रवासात प्रवासी कंपनीकडून होणारी फसवणूक, रुग्णालयांकडून आरोग्यविषयक होणारी लुबाडणूक, फसवणूक अथवा दुर्लक्ष, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये होणारी फसवणूक, दुकानदारांकडून वजनात, वस्तूच्या दर्जाबाबत होणारी फसवणूक अशा एक ना अनेक प्रकारच्या तक्रारींमध्ये तुम्हाला ग्राहक पंचायतीकडून न्याय मिळवता येतो. 20 लाखांच्या खरेदीपर्यंत झालेल्या फसवणुकीबाबत जिल्हा ग्राहक पंचायतीकडून, तर 1 कोटी रुपयांच्या खरेदीपर्यंत राज्य ग्राहक पंचायतीकडून ग्राहकांना न्याय मिळू शकतो. ग्राहक पंचायतीमध्ये दाखल झालेली प्रत्येक तक्रार ग्राहकांचे हित लक्षात घेऊन हाताळली जाते. इथे ग्राहक हक्काला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. अशाच काही तक्रारी आणि त्यांच्या झालेल्या निवारणाबाबत आपण माहिती घेणार आहोत.
अहमदनगरच्या अॅड. प्रज्ञा हेंद्रे-जोशी यांच्याकडे वैद्यकीय हलगर्जीपणाची तक्रार आली होती. दोन वर्षांच्या मुलाला ताप आल्याने नगरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराचा भाग म्हणून त्या मुलाला पायातून सलाइन देण्यात आले. मात्र, सलाइन व्यवस्थित न लावल्यामुळे त्या मुलाच्या पायाला इजा झाली. मुलाच्या पायावर झालेली जखम काही दिवसांनी बरी झाली, मात्र पायाची सूज तशीच राहिली. पुढे पंधरा दिवस झाले तरी पायाची सूज उतरत नव्हती. त्यामुळे त्या मुलाला दुसºया रुग्णालयात नेण्यात आले. या मुलाच्या पायातून जे सलाइन लावण्यात आले होते, त्यामुळे मुलाच्या पायात पू झाला आणि तेथे जखम झाल्याचे त्या मुलाला तेथील दुसºया रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सांगण्यात आले. या मुलाचे वडील रिक्षाचालक असल्याने रुग्णालयाचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. मग शेवटी त्या मुलाच्या वडिलांनी ग्राहक पंचायतीत तक्रार दाखल केली. या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर ग्राहक पंचायतीने मुलाला ज्या पहिल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांच्याकडून मुलाच्या वडिलांना त्या रुग्णालयात झालेला खर्च, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई तसेच तक्रारीचा खर्च देणे भाग पाडले. कारण वैद्यकीय उपचारातील चुकीमुळे झालेला हा त्रास होता.
दुसरे उदाहरण नगर येथे राहणाºया एका कुटुंबाचे आहे. या कुटुंबाने एका दुकानातून फ्रिज विकत घेतला. मात्र, काही दिवसांतच हा फ्रिज बंद पडला. दोन-तीन वेळा दुरुस्त करूनही फ्रिज नीट चालत नव्हता. तेव्हा या कुटुंबाने संबंधित कंपनीकडे तक्रार दाखल केली आणि फ्रिज बदलून मागितला. कंपनीने सदर फ्रिज बदलून देण्यास स्पष्ट नकार दिला. कंपनीची अडेल भूमिका बघून शेवटी या कुटुंबाने ग्राहक पंचायतीकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाची सर्व माहिती घेतल्यानंतर ग्राहक पंचायतीने संबंधित कंपनीकडून ग्राहकाला नवीन फ्रिज मिळवून दिला, त्याचबरोबर मानसिक त्रासाबद्दल आर्थिक नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्चही मिळवून दिला. असेच एक उदाहरण सोलर वॉटर हिटरचे आहे. एका ग्राहकाने सोलर कंपनीकडून सोलर वॉटर हिटर विकत घेतला. मात्र, वॉटर हिटरमुळे पाणी गरम होत नव्हते. सुरुवातीला कंपनीकडे पाठपुरावा करून काही प्रतिसाद मिळत नसल्याने या ग्राहकाने ग्राहक पंचायतीत तक्रार दाखल केली. ग्राहक पंचायतीने ग्राहकाला योग्य तो न्याय मिळवून दिला.
जालना ग्राहक मंचाच्या सदस्य रेखा कापडिया यांनीही या जिल्ह्यातील अनेक ग्राहकांना फसवणुकीबाबत न्याय मिळवून दिलाय. मग ती तक्रार सामान्य ग्राहकाची असो वा एखाद्या विमान कंपनीकडून झालेल्या फसवणुकीची असो. त्यांच्याकडे एका विमान कंपनीने केलेल्या फसवणुकीची तक्रार आली होती. जालन्याच्या एका दांपत्याने 24 तासांच्या विमान प्रवासात शाकाहारी जेवण हवे, असे लिहून दिले होते. मात्र, तरीही त्यांना विमानात मांसाहारी जेवण देण्यात आले. त्यांनी विमानातील कर्मचाºयांना शाकाहारी जेवण देण्याची विनंती केली, मात्र तरीदेखील त्यांना शाकाहारी जेवण मिळाले नाही. त्यामुळे त्यांना उपाशी राहावे लागले. या दांपत्याने त्या खासगी विमान कंपनीविरुद्ध ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली आणि ग्राहक न्यायालयाने निकाल दांपत्याच्या बाजूने दिला. या प्रकरणात त्या विमान कंपनीला या दांपत्याची माफी मागण्याबरोबरच आर्थिक नुकसान भरपाईही द्यावी लागली.
जळगावच्या अॅड. प्रेरणा साळुंके यांनीही महावितरण वीज कंपनीविरोधात तक्रार दाखल केली. प्रत्येक वेळी वीज बिलाबरोबरच वीज कंपनी मीटरचे पैसे आकारत होती. हे लक्षात आल्यावर अॅड. साळुंके यांनी ग्राहक मंचात स्वत:ची केस स्वत:च लढवत वीज कंपनी वीज ग्राहकांची कशी लुबाडणूक करत आहे हे उघड केले. ग्राहक मंचात वीज कंपनीच्या विरोधात निकाल लागला. पुढे हे प्रकरण औरंगाबाद उच्च न्यायालयात गेले. तीन वर्षे उच्च न्यायालयात चाललेल्या खटल्यात वीज कंपनीविरोधातच निकाल लागला. न्यायालयाच्या आदेशानुसार भरपाई म्हणून वीज कंपनीने अॅड. साळुंके यांना मीटरचे आकारलेले पैसे व्याजासह परत केले. याबाबत अॅड. प्रेरणा साळुंके म्हणतात की, वीज कंपन्या अशा छुप्या पद्धतीने ग्राहकांची फसवणूक करतात. मात्र, हा तत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळेच या निकालात मला सर्व मीटरचे पैसे परत मिळाले, तसेच मानसिक त्रास झाल्याबद्दल नुकसान भरपाईही मिळाली. ग्राहकाने जागरूक राहून फसवणुकीविरोधात तक्रार करण्याची मानसिक तयारी दर्शवणे आवश्यक आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारी सदस्य बाळ कुलकर्णी म्हणतात की, हेवाल्ड या वीजनिर्मिती कंपनीने एका प्रथितयश बँकेविरुद्ध कायदेशीर लढा पुकारला होता. त्यांना बºयाच प्रयत्नांनंतर न्याय मिळाला होता. या कंपनीला बँकेने हिशेब चुकीचे देणे, तसेच व्याजदरात तफावत असल्याने कर्जाचे हप्ते भरल्यावरही पैसे आकारणे, तसेच गैरमार्गाने वस्तूंवर जप्ती आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या कंपनीने उच्च न्यायालयात तसेच ग्राहक मंचातही तक्रार नोंदवली. त्यानंतर या कंपनीला न्याय मिळाला. दुसरे एक असेच उदाहरण देता येईल. एका बँकेने मुदत ठेवीवर अष्टचक्र योजना लागू केली. वास्तविक ही योजना लागू केल्यानंतर बँकेच्या सर्व ठेवीदारांना कळवणे आवश्यक होते.
नियमाप्रमाणे बँकेने मात्र कोणालाच न कळवल्याने या बँकेविषयी तसेच बँकेच्या हेतूविषयी संभ्रमाची भावना निर्माण झाली आणि त्यामुळेच ठेवीदारांनी या बँकेविरोधात जिल्हा ग्राहक मंच आणि राज्य आयोगाकडे तक्रार दाखल केली. तेव्हा ग्राहक मंचाने आणि राज्य आयोगाने ठेवीदारांच्या बाजूने निकाल दिला. अशी अनेक उदाहरणे देता येतील की आपण आपल्या ग्राहक हक्कांबद्दल जागरूक राहून लढाई दिली तर ती निश्चितच यशस्वी होते. आज ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी व्यापक मोहीम हाती घ्यायला हवी. ग्राहक चळवळीचे आज या बाबतीत एक आशायादी चित्र दिसते आहे. ग्राहक न्यायालयांमुळे ग्राहकांचे एकीकडे सबलीकरण झाले आहे आणि ग्राहकांमध्ये आपल्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. ग्राहक चळवळ अधिक व्यापक करून या चळवळीत ग्राहकांना संघटित करणे आवश्यक आहे. यासाठी विविध माध्यमांतून प्रबोधन आणि जनजागृती यावर भर देणे आवश्यक आहे.