ग्राहक वारंवार मोबाईल फोन का बदलत आहेत?

Sports

‘अरे यार! हा फोन दीड वर्षांपूर्वीच विकत घेतला होता. मात्र तो आतापासूनच हँग होतो आहे.’
‘गॅलरीत तर भरपूर फोटो आहे, स्टोरेजचा प्रॉब्लेम होणार.’
‘माहित नाही यार, काय करू, रिपेअर करून घेऊ का.?’
‘बॅटरीचा प्रॉब्लेम दिसतोय यार, नवीन विकत घेऊन टाक.’
‘याचं काय करू?’
‘घरी आजीला देऊन टाक किंवा एक्सचेंज करून घे, नवा फोन थोडा स्वस्त पडेल.’

दिल्लीतील एका मेट्रो स्टेशनवर महाविद्यालयातील 2 विद्यार्थ्यांमधील या संवादातून भारतातील मोबाईल फोनच्या बाजारपेठेसंदर्भातील अनेक गोष्टी एकाचवेळी दिसून येतात.

मात्र ही परिस्थिती नेहमीच अशी नव्हती.

31 जुलै 1995 हा तो महत्त्वाचा दिवस. याच दिवशी भारतात पहिल्यांदा मोबाईल फोनची रिंग वाजली होती.

त्यावेळचे कम्युनिकेशन मंत्री असलेले सुखराम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योति बसू यांच्यात पहिला कॉल झाला होता.

तेव्हापासून भारतात मोबाईल फोनचा इतका धडाक्यानं विस्तार झाला की, आता देशातील 85.5 टक्के कुटुंबांमध्ये किमान 1 स्मार्टफोन आहे. या सर्व कालावधीत मोबाईल फोननं आणि भारतानं बराच मोठा पल्ला गाठला आहे.

आता मोबाईल फोन हे फक्त बोलण्याचं उपकरण राहिलेलं नाही. आता ते अनेकांसाठी बँक, कॅमेरा, गेमिंग कंसोल, व्हीडिओ कॉलर, क्लासरूम आणि टीव्हीदेखील आहे.

सरकारच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक मोबाईल फोनचं उत्पादन करणाऱ्या देशात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात मोबाईल फोनचं उत्पादन करणारे 300 कारखाने आहेत.

भारतात दरवर्षी तब्बल 33 कोटी मोबाईल फोनचं उत्पादन होतं. याव्यतिरिक्त परदेशातून येणारे मोबाईल फोन वेगळेच. सध्या भारतात सरासरी 1 अब्ज मोबाईल फोनचा वापर होतो आहे.

भारतात 215 अब्ज डॉलर किमतीच्या मोबाईलची विक्री होते आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

स्वस्त किंवा परवडणारे आणि प्रीमियम, अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईल फोनची दणकून विक्री होते आहे. भारताची मोबाईल फोनची निर्यातदेखील वाढली असून 2024-25 मध्ये ती 24.1 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

मोबाईल फोन स्वस्त झाले आहेत का?
या सर्व आकडेवारीदरम्यान एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो, तो म्हणजे आता ग्राहक वारंवार मोबाईल फोन का बदलत आहेत? त्यांचं नवीन फोन विकत घेण्याचं प्रमाण का वाढलं आहे?

मोबाईल फोन स्वस्त झाले आहे का की फायनान्सचा प्रश्न सुटल्यामुळे ईएमआयवर फोन घेणं लोकांसाठी सोपं झालं आहे का?

मोबाईल फोन तुलनेनं कमी टिकत आहेत का आणि जुन्या फोनइतके मजबूत नाहीत का?

सॉफ्टवेअर अपडेट आणि हार्डवेअरमधील बदलांनी नवीन फोन घेणं आवश्यक झालं आहे का?

मोबाईल फोन ग्राहकांचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आहे का?

की हे सर्व मुद्दे खरे आहेत!

तंत्रज्ञान तज्ज्ञ मोहम्मद फैसल अली कवूसा याचा संबंध व्यापक बदलांशी जोडतात. त्यांच्या मते जर तुम्ही कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सबाबत ग्राहकांचं वर्तन पाहिलं तर त्यात खूप बदल झाला आहे.

एक काळ असा होता की टीव्हीबद्दल लोकांना वाटायचं की ही वस्तू अनेक पिढ्यांसाठी घरात येते आहे. वडील विकत घ्यायचे किंवा काहीवेळा आजोबा विकत घ्यायचे आणि मुलगा-नातू ते वापरायचे.

मात्र आता तुम्हाला दिसतं की एकाच पिढीत अनेक टीव्ही बदलले जातात. हा पिढीमधील बदल आहे. त्यांना वाटतं की अपडेट राहावं. तसंच ही पिढी हा खर्चदेखील करू शकते.

वारंवार नवीन मोबाईल फोन विकत का घ्यावा लागतो?
यावर कवूसा यांनी बीबीसीला सांगितलं, स्मार्टफोनचा विचार करता, एकतर सेल्युलर तंत्रज्ञानात बदल होत आहेत. 3जी, 4जी आणि 5जी तंत्रज्ञान आलं आहे. काही वर्षांनी 6जी तंत्रज्ञानदेखील येईल. नवीन मोबाईल फोन विकत घेण्यामागं हे एक मोठं कारण आहे.

याशिवाय काहीवेळा फोन हँग होऊ लागतो किंवा धीमा होतो. काहीवेळा बॅटरीच्या समस्या येऊ लागतात. या कारणांमुळे ग्राहक नवीन मोबाईल फोन विकत घ्यायचा विचार करू लागतो.

मात्र फोनमध्ये लॅग का येतो? असं तर नाहीना की मोबाईल फोनचा वापरच इतका वाढला आहे की त्यामुळे मोबाईलची क्षमता लवकरच कमी होते.

काउंटरपॉईंट रिसर्च ही जागतिक पातळीवर तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेत संशोधन करते. या कंपनीचे रिसर्च संचालक तरुण पाठक याच मुद्द्यांकडे लक्ष वेधतात.

ते म्हणतात की आधी फीचर फोन(बटणांचा वापर करावा लागणारे मोबाईल फोन) असायचे. त्यात आपण कॉल करायचो, थोडाफार गेम खेळायचो. सरासरी दिवसातून दोन तास फोनचा वापर करायचो.

मात्र आता भारतात मोबाईल फोनचा रोजचा वापर सरासरी सहा ते साडे तासांचा आहे. यात तिप्पट वाढ झाली आहे. दिवसाचा एक चतुर्थांश वेळ लोक फोनवर घालवत आहेत. त्यामुळे त्यांना अपाय होण्याचा धोकादेखील वाढला आहे.

कवूसा यांचंही म्हणणं आहे की स्मार्टफोन हे नेहमी, वारंवार वापरलं जाणारं उपकरण आहे. तो हातात असतो, खाली पडतो. त्यामुळे फोन डॅमेज होण्याचा धोका असतो. त्यात 19-20 चा फरकदेखील पडतो. मग आपण तक्रार करू लागतो की फोनमध्ये प्रॉब्लेम येतो आहे.

2017 मध्ये स्मार्टफोनचं मार्केट शिखरावर होतं. त्यावर्षी जगभरात 1.4-1.5 अब्ज स्मार्टफोन विकले गेले होते. मग ही बाजारपेठ स्थिरावत गेली आणि आता त्यात घसरण होते आहे. आता जगभरातील स्मार्टफोनची बाजारपेठ 1.2 अब्ज डॉलरची आहे.

तरुण पाठक यांनी बीबीसीला सांगितलं, याचा अर्थ असा आहे की लोक आहे तो फोन अधिक काळ वापरत आहेत. जर आपण आकडेवारीकडे पाहिलं तर लोक दोन वर्षांत स्मार्टफोन बदलतात या कल्पनेला कोणताही आधार दिसून येत नाही.

अर्थात जाणकारांना ही गोष्टदेखील मान्य आहे की ग्राहकांकडे मोबाईल फोन बदलण्यासाठी अनेक कारणंदेखील आहेत.

शिबानी, टेक रिव्ह्यूवर आहेत आणि सीएनबीसी-टीव्ही 18 मध्ये अँकर आहेत. त्या म्हणतात की बहुतांशवेळा मोबाईल फोन अपडेट आल्यामुळे, बॅटरी कमकुवत झाल्यामुळे आणि हार्डवेअरच्या मर्यादेमुळे ‘निरुपयोगी’ होतात.

काळानुरुप अ‍ॅप्स आणि ऑपरेटिंग सिस्टमना अधिक प्रोसेसिंग पॉवर आणि मेमरीची आवश्यकता आहे. त्यामुळे फोनचे जुने मॉडेल अधिक काळ चालू शकत नाहीत.

शिबानी यांच्या मते, रिप्लेसमेंट पुश किंवा चेंज सायकल, पूर्णपणे नैसर्गिक नाही. किंबहुना अंशत: डिझाईनना दिली जात असलेली पसंती हे त्यामागचं कारण आहे. यात टिकाऊपणापेक्षा इनोवेशन स्पीड आणि ग्राहकांच्या संख्येला महत्त्व दिलं जातं.

वॉशिंग मशीन किंवा मायक्रोवेव्ह सारखी उपकरणं दशकातून एकदा विकत घेतली जातात. मात्र मोबाईल फोन असं उत्पादन झालं आहे की ते अपग्रेड होतात आणि त्यातून नफ्याचं चक्र सुरू राहतं.

शिबानी बीबीसीला म्हणाल्या, “भलेही मोबाईल फोनचं उपकरण काम करत असेल, मात्र अपडेट थांबल्यानंतर ते काम करू शकत नाहीत. काही कंपन्या सहा वर्षांचं सॉफ्टवेअर अपडेट आणि सिक्युरिटी पॅच देतात. मात्र अशांची संख्या फार थोडी आहे.”

“अनेकजण असे आहेत की ते अजूनही तीन ते पाच वर्षे फोन वापरत आहेत. मात्र पूर्वी जसं मोबाईल फोन विकत घेणं म्हणजे महागडी किंवा मोठी बाब मानली जायची, तसं आता राहिलेलं नाही.”

शिबानी यांच्या या मुद्द्याशी तरुण पाठकदेखील सहमत आहेत. ते म्हणतात, “एक गोष्ट खरी आहे की फोनमध्ये बरेच बदल झाले आहेत. उदाहरणार्थ बॅटरी. आता फास्ट चार्जिंग आलं आहे. बॅटरीची चार्ज सायकल बदलली आहे. तीन-चार वर्षआनंतर बॅटरीची क्षमता कमी होते.”

“त्यामुळे लोकांना तीन-चार वर्षानंतर मोबाईल फोन बदलावाच लागतो. असे फार थोडे ब्रँड आहेत, जे सॉफ्टवेअर किंवा सिक्युरिटी अपडेट पाच-सहा वर्षांसाठी देतात.”

“फोनमध्ये साठवण्यात येणाऱ्या माहितीचं प्रमाण इतकं जास्त आहे की फोनमधील स्टोरेज क्षमता संपते. बॅटरी, रॅमप्रमाणेच मेमरीचं देखील चक्र असतं. या गोष्टींची एक शेल्फ लाईफ असते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *