संजय राऊत यांनी राज ठाकरे काँग्रेसला सोबत घेण्यास उत्सुक असल्याचे विधान केले होते. यावरून मनसेत तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यानंतर राऊत यांनी राज ठाकरेंना थेट मेसेज करून गैरसमज दूर केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे, अशी राज ठाकरेंची इच्छा आहे, असे वक्तव्य केले होते. आता यावरुन राजकारणात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आता यावर संजय राऊत यांनी युटर्न घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट मेसेज करत स्पष्टीकरण दिले आहे. मी असे काहीही बोललो नाही’ असा खुलासा संजय राऊत यांनी या मेसेजमध्ये केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी एकत्र यावे आणि आगामी निवडणुकीत राजकीय युती करावी, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, महाविकास आघाडी (MVA) या संभाव्य युतीला पाठिंबा देणार का, यावर तर्क-वितर्क सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले होते. तसेच, मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचे असल्यास तो निर्णय दिल्लीतून होईल, असेही त्यांनी म्हटले होते.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले होते. स्वतः राज ठाकरे यांची अशी इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे. या राज्यात प्रत्येकाचे एक स्थान आहे. जसे शिवसेनेचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, शरद पवार साहेबांचे, डाव्या पक्षांचे, तसेच काँग्रेससुद्धा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष आहे. शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश होणे गरजेचे आहे. ही सर्वांचीच भूमिका असून राज ठाकरेंची सुद्धा तीच भूमिका आहे.” असे संजय राऊत म्हणाले होते.
संजय राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज काय?
संजय राऊत यांच्या या विधानानंतर राज ठाकरे यांची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा असल्याचा अर्थ काढण्यात आला. यानंतर मनसेच्या नेत्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडत तीव्र प्रतिक्रिया दिल्या. यानंतर याप्रकरणी गैरसमज वाढल्याचे लक्षात येताच संजय राऊत यांनी तातडीने राज ठाकरे यांना मेसेज पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मेसेजमध्ये संजय राऊत यांनी मी असे काहीही बोललो नाही, असे स्पष्ट केले आहे. माझ्या वक्तव्याचा तो अर्थ नाही, असे त्यांनी राज ठाकरे यांना कळवले आहे. यामुळे संजय राऊत यांच्या विधानामुळे निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे बोललं जात आहे. तसेच यामुळे मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील संभाव्य राजकीय जवळीक टिकवण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.