तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या चित्रपटामुळे कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील एक सर्वसामान्य कलाकार ऋषभ शेट्टी देश आणि जगभरात लोकप्रिय झाला. आपल्या गावाच्या मातीतली कथा त्याने मोठ्या पडद्यावर उत्कृष्टपणे मांडली आणि त्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर त्या चित्रपटाचा प्रीक्वेल ‘कांतारा : चाप्टर 1’ प्रदर्शित झाला. हा प्रीक्वेल पहिल्यापेक्षाही अधिक भव्यदिव्य आणि प्रभावी असल्याचं कौतुक प्रेक्षक करत आहेत. ऋषभ यामध्ये मुख्य भूमिकेत असून त्यानेच दिग्दर्शनसुद्धा केलंय. या भूमिकेसाठी त्याने घेतलेली प्रचंड मेहनत स्क्रीनवर स्पष्ट दिसून येते. ‘कांतारा’प्रमाणेच ‘कांतारा: चाप्टर 1’चा क्लायमॅक्स विशेष चर्चेत आहे. या क्लायमॅक्सचं शूटिंग करताना ऋषभची जी अवस्था झाली होती, त्याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
जगभरात ‘कांतारा : चाप्टर 1’ला भरभरून प्रतिसाद मिळत असताना, बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचताना ऋषभने सेटवरचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याचे सुजलेले पाय पहायला मिळत आहेत. ‘क्लायमॅक्स शूटिंगची वेळ.. सुजलेले पाय, थकलेलं शरीर.. आज कोट्यवधी लोकांनी तो पाहिला आणि त्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आमचा ज्या शक्तीवर विश्वास आहे, त्या शक्तीच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य झालं नसतं. ज्यांनी हा चित्रपट पाहिला आणि आपली मतं व्यक्त केली, त्यांचे मी आभार मानतो’, असं त्याने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.
ऋषभचे हे फोटो पाहून चाहत्यांनी त्याच्या मेहनतीसमोर हात जोडले आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो गेल्या तीन-चार वर्षांपासून कुटुंबीयांसह त्याच्या गावीच राहत आहे. या संपूर्ण प्रवासात पत्नी प्रगतीने खूप साथ दिल्याचं त्याने वेळोवेळी म्हटलंय. ऋषभच्या पत्नीनेच चित्रपटासाठी कॉस्च्युम डिझाइनिंगचं काम केलंय. ‘कांतारा: चाप्टर 1’मध्ये ऋषभ शेट्टीसोबत रुक्मिणी वसंत, जयराम, गुलशन देवैया आणि प्रमोद शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा 450 कोटींचा टप्पा पार केला आहे.

