MPSCचे विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर; संदीप देशपांडे म्हणाले, ‘साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील…’

Politics

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) आज भेट घेतलेली आहे. पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंना निवेदन दिलेलं आहे, आज ही भेट ठरवण्यात आलेली होती आणि राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. याबाबतीत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ज्या मूळ समस्या आहेत, पेपर फुटीच्या संदर्भातल्या त्याच्यावर तुम्ही भाष्य करायला पाहिजे, आज महाराष्ट्रामधला सर्व मराठी माणूस हा सन्माननीय राज साहेबांकडे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत असतो आणि आमच्याकडून जी शक्य होईल, ती सर्व मदत, त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून करत असतो. मला असं वाटतं याच्यासंदर्भात आता राजसाहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि निश्चितपणे या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी आहे. उद्या जर याच्यावर कुठली कारवाई झाली नाही आणि त्यांनी आंदोलन करायचा निर्णय घेतला तर 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे हे त्यांच्या पाठीमागे उभे राहतील, अशी प्रतिक्रिया देखील संदीप देशपांडेंनी दिली आहे.(Raj Thackeray)

MPSC Student Meet Raj Thackeray : MPSC चे विद्यार्थी हे राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर
MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थी राज ठाकरेंना निवेदन दिले आहेत
निवेदनात विद्यार्थी म्हणालेत;

विषय : MPSC औषध निरीक्षक (Drug Inspector) परीक्षा घोटाळा व राज्यव्यापी पेपरफुटी प्रकरणाची सखोल निष्पक्ष चौकशी करून भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करणे व परीक्षा रद्द करून ‘फेरपरीक्षा’ (Re-Exam) घेण्याबाबत.

संदर्भ: MPSC आयोग आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे विद्यार्थ्यांमार्फत दाखल तक्रारी (दि. २१, २३ व २४ जुलै २०२६).

आदरणीय राजसाहेब,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेत झालेल्या महाघोटाळ्याकडे व पेपरफुटीकडे आम्ही महाराष्ट्रभरातील लाखो अन्यायग्रस्त व प्रामाणिक फार्मसी विद्यार्थ्यांच्या वतीने आपले लक्ष वेधत आहोत. गेल्या ५ ते १० वर्षांपासून अहोरात्र मेहनत करणाऱ्या गरीब व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा चुराडा करून, दलालांच्या संगनमताने हा पेपर संपूर्ण राज्यभर विकला गेल्याचे उघड झाले आहे.

घडलेल्या घटनांचा संक्षिप्त व धक्कादायक घटनाक्रमः

1. २० मार्च २०२६ः प्रत्यक्ष परीक्षेच्या दोन दिवस आधीच मूळ प्रश्नपत्रिका WhatsApp वर लीक झाली [source: 1]. परीक्षेतील तब्बल ९० प्रश्न व पर्याय तंतोतंत जुळणारे पुरावे उपलब्ध आहेत.

2. २२ मार्च २०२६: पेपर आधीच लीक झालेला असतानाही MPSC आयोगाने नियोजित स्क्रीनिंग परीक्षा घाईघाईत पार पाडली.

3. २१ ते २४ जुलै २०२६: विद्यार्थ्यांमार्फत डिजिटल पुरावे, मूळ चॅट्स, स्क्रीनशॉट्स व बोगस प्रमाणपत्रांचे कागदपत्रे MPSC व FDA विभागाला प्रत्यक्ष सादर करण्यात आले.

4. २७ जुलै २०२६: विद्यार्थ्यांच्या रेट्यामुळे MPSC ने चौकशीचे आदेश दिले, मात्र तरीही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली नाही.

आमच्या प्रमुख आणि ठाम मागण्याः

1. भरती प्रक्रियेला तात्काळ स्थगिती (Stay on Recruitment): चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि सत्य बाहेर येईपर्यंत औषध निरीक्षक पदाची चालू भरती प्रक्रिया एका झटक्यात थांबवण्यात यावी.

2. संपूर्ण परीक्षा रद्द करून ‘फेरपरीक्षा’ (RE-EXAM): डिजिटल युगात राज्यभर फॉरवर्ड झालेला पेपर कुणाकुणाकडे पोहोचला हे शोधणे अशक्य आहे. त्यामुळे ‘फिल्ट्रेशन’ची धूळफेक न करता, २२ मार्च रोजी झालेली परीक्षा तात्काळ रद्द करून १००% पारदर्शक पद्धतीने ‘Re-Exam’ घेण्यात यावी.

3. स्वतंत्र व वेळेत पूर्ण होणारी CID/न्यायिक चौकशीः या रॅकेटमध्ये सहभागी असणारे दलाल, खाजगी अकॅडमी, संस्थाचालक व भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

4. बोगस प्रमाणपत्रांची सखोल तपासणी: काही उमेदवारांनी सादर केलेल्या संशयास्पद दिव्यांग व इतर प्रमाणपत्रांची फॉरेन्सिक व वैद्यकीय बोर्डामार्फत स्वतंत्र पडताळणी व्हावी.

साहेब, हा विषय केवळ एका परीक्षेचा नसून महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या आरोग्याशी आणि औषध नियंत्रणाशी संबंधित आहे. जर पेपर फोडणारे बोगस लोक ‘औषध निरीक्षक’ बनले, तर उद्या राज्यातील कोट्यवधी जनतेच्या जीवाशी खेळ होईल.आपल्या ठाम भूमिकेवर आणि आक्रमक नेतृत्वावर महाराष्ट्रातील तरुणांचा गाढा विश्वास आहे. आपण या प्रकरणात स्वतः लक्ष घालून शासनाला व MPSC ला आदेश देण्यास भाग पाडावे आणि आम्हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, हीच नम्र विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *