2029 पूर्वीच देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत, विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली इच्छा, कारणही सांगितलं!

Politics

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या संसदीय मंडळात पुन्हा निवड झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीस यांच्या पंतप्रधानपदाच्या संभाव्यतेवर मोठं वक्तव्य केलं आहे. “आमची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी 2029 च्या पूर्वी पंतप्रधान व्हावं. कारण 2029 नंतर तर त्यांना काही संधी नाही. एकदातरी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा,” अशी इच्छा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

वडेट्टीवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यामुळे त्याची नियुक्ती भाजपच्या वरिष्ठ समितीत केली असावी. ते सिनियर नेते आहे, भारतीय जनता पक्षाने कोणाला कुठे घ्यायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी 2029 च्या पूर्वी पंतप्रधान व्हावे, अशी आमची इच्छा आहे. 2029 नंतर तर काही संधी नाही. एकदातरी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, अशी आमची इच्छा आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना भाजप पुढे नेतील की एवढ्यावरच मर्यादित ठेवणार, हे आपल्याला पाहायला मिळेल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले

मनोज जरांगे यांच्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्राच्या मागणीबाबत वडेट्टीवार यांनी सरकार आणि जरांगे यांच्यातील भूमिकेवर भाष्य करण्यास नकार दिला. ते म्हणाले, “जरांगेंच्या मागण्यांवर सरकार पाहत बसेल. त्याच्यावर मी अजिबात बोलणार नाही. जरांगे आणि सरकार यांचं आता काय आहे , सरकारचे कोणते मंत्री जातील कोण जाणार नाही, ते काय उपोषण करतील याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आमची भूमिका एवढीच आहे की, आमची जातनिहाय जनगणना करा आणि आमचं आम्हाला द्या. जर काही बोगस नोंदी असतील तर ते कोर्टात टिकणार नाही. आताही निर्णय झाले, पुढे होणार आहे. न्याय आणि संविधानाच्या चौकटीत बसतील त्यांना त्या जातीत समावेश केलं जाईल. कोणी म्हणते म्हणून निर्णय घेतला तरी तो टिकणार नाही. त्यामुळे त्यावर फार काही बोलायची गरज वाटत नाही.,” अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली आहे.

हुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आदिवासी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केले आहे, यावर वडेट्टीवार म्हणाले, जी मुलगी स्टेजवर आली होती ती आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी वेदना घेऊन आली होती. तिने मराठी भाषेत आदिवासी विद्यार्थ्यांवर सरकार कशा पद्धतीने अन्याय करत आहे आणि त्यांना सुविधांपासून वंचित ठेवलं जात आहे, हे मांडलं. सरकार आदिवासी मुलींवर अविश्वास दाखवत असल्याचेही त्यांनी सांगितलं. कसं त्यांच्या चारित्र्यावर अविश्वास दाखवत आहे, असे गंभीर प्रश्न निर्माण होतात. ते विषय राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चा करण्यासाठी पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री यावर प्राथमिकता देऊन आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सुटे तेल विक्री बंदीचा निर्णय चुकीचा असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले, तुकाराम मुंडे यांनी घेतलेला हा निर्णय मंत्रिमंडळाने रद्द केला असेल तर तो चांगला निर्णय आहे. हा निर्णय तेली समाजावर अन्याय करणारा होता. गरीब आणि सामान्य मध्यमवर्गीय लोक आपल्या गरजेप्रमाणे सुटे तेल खरेदी करतात. जनतेचा आक्रोश पाहून हा निर्णय रद्द झाला असावा, आणि घेतलेला निर्णय चांगला असल्याचेही त्यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. राहुल गांधी तरुणांच्या पाठीशी उभे आहेत. विद्यार्थ्यांसाठी लढणाऱ्यांच्या सोबत उभं राहणं, जनतेच्या प्रश्नांसाठी लढणं, ही राहुल गांधी यांची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, राहुल गांधी यांनी नागपुरातील विद्यार्थ्यांसोबत ‘छात्रो की गुंज’ संवाद साधण्यासाठी होकार दिला असून, कार्यक्रमाची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितलं.

आपल्या मते देवेंद्र फडणवीस 2029 च्या आधी पंतप्रधान होणे शक्य आहे का? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा.कमेंटसाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *