बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठा आरक्षणाचा सगळा पचका केला

Politics

हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, मात्र चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांनी सगळ्याचा पचका केला, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला. ज्या 58 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र कसं देणार आहात ते आधी स्पष्ट करा, असंही मनोज जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे हे 29 ऑगस्टपासून उपोषण करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या तीन मंत्र्यांनी त्यांची भेट घेतली.

राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभुराज देसाई, आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने आंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका नेमकी काय याची माहिती त्यांनी जरांगे यांना दिली. त्याचवेळी ज्या गोष्टींवर मनोज जरांगे यांना आक्षेप आहे, त्यावर काम करण्याचं आश्वासनही दिलं.

तुम्ही लई चिंगूस माणूस आहात, सगळं दमादमानं घेताय. मराठा आरक्षण खपाखप देऊन टाका, असं मनोज जरांगे हे राधाकृष्ण विखे पाटील यांना उद्देशून म्हणाले.

बावनकुळे आणि संजय शिरसाटांवर टीका

शिंदे समितीने राज्यातील 58 लाख कुणबी नोंदी शोधल्या. त्यानुसार राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केलं आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश काढले. मात्र यामध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांनी खोडा घातला आणि प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश दिला, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

अधिकाऱ्यांना समोर बसवून सांगा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही चर्चेला येत असताना सोबत संबंधित अधिकारी घेऊन येत चला. जी प्रमाणपत्रं रद्दं केली जात आहेत, किंवा ज्यांना प्रमाणपत्रं दिली जात नाहीत, त्यावर काय करता येईल हे अधिकाऱ्यांना समोर बसवून विचारा. मराठ्यांना प्रमाणपत्रं कशी देता येतील हे सोप्या शब्दात सांगा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

आम्ही हमाली करतो…

आम्हाला जर तुम्ही प्रमाणपत्र देणार नसाल तर स्पष्ट सांगा, आम्ही उद्यापासून आरक्षण मागणार नाही. आम्ही दुसऱ्या राज्यात जाऊन हमाली करतो, सगळे मराठे फासावर जातो, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला.

राज्यात ओबीसी प्रमाणपत्राचं काम कधी थांबलं आहे का? मग मराठ्यांना प्रमाणपत्र देण्याचं काम का थांबवलं जातंय? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. ज्याप्रमाणे ओबीसींचे काम सुरू आहे त्या प्रमाणेच मराठ्यांच्या प्रमाणपत्राचंही काम सुरू राहू दे अशी मागणी यावेळी जरांगे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *