Silver Price Crash: चांदीच्या दरामध्ये सुरु झालेली पडझड काही थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. चांदीचा दर सध्या 249300 रुपयांवर पोहोचले आहेत.
सोने आणि चांदीच्या दरात ज्या वेगानं वाढ झाली होती, त्याच वेगानं घसरण सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरानं 4 लाख 20 हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, अवघ्या चार दिवसात चांदीचे दर 1 लाख 70 हजार रुपयांनी घटले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीचे दर घसरण सुरु आहे.
31 डिसेंबर 2024 ला चांदीचा दर 86 हजार रुपये होता. चांदीच्या दरानं 29 जानेवारीला 420048 रुपये किलोचा उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर सुरु झालेली चांदीच्या दरातील घसरण थांबत नसल्याचं पाहायला मिळतंय. रविवारी चांदीचे दर 265652 रुपयांवर होते. इंट्राडेमध्ये चांदीचे दर 225805 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यानंतर बाजार सावरला आणि चांदीचा दर 249300 रुपयांपर्यंत पोहोचला. म्हणजेच उच्चांकावरुन चांदीचा दर 1 लाख 70 हजार 748 रुपयांनी कमी झाला आहे.
Silver Rate : चांदी पावणे दोन लाखांनी स्वस्त
अर्थंसकल्पापूर्वी चांदीच्या दरानं मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यास सुरुवात केल्यानं चांदीचे दर पडले.
एकीकडे चांदीचे दर घसरत असले तरी दुसरीकडे सोन्याचे दर देखील पडल्याचं पाहायला मिळतंय. अर्थसंकल्पाच्या दिवशी देखील कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याचे दर पडल्याचं पाहायला मिळालं. रविवारी 2 एप्रिलच्या वायद्याचे सोन्याचे एका तोळ्याचे दर 147753 रुपयांवर होते. सोन्याच्या दरात आज 137065 रुपयांपर्यंत घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा सोन्याचे दर वाढले आणि इंट्राडे ट्रेडिंग बंद झालं तेव्हा सोन्याचे एका तोळ्याचे दर 146016 रुपयांवर पोहोचले होते.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरानं 193096 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोन्याचा दर 47080 रुपयांची घसरण झाली आहे.
सोने आणि चांदीच्या दरात का घसरण?
सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यासाठी विक्री करत पैसे काढून घेण्याचा निर्णय घेतला. हे देखील घसरणीचं प्रमुख कारण आहे.चांदीची औद्योगिक वापरासाठीची मागणी कमी झाल्यानं चांदीचे दर घसरले आहेत. प्रामुख्यानं चीन आणि यूरोपमधून मागणी कमी झाली आहे. याशिवाय अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या जागी केविन वॉर्श यांना संधी देण्याचं वक्तव्य केलं आहे. या सर्वाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर होतोय.
सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. मात्र, दागिने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

